नवी दिल्ली : केरळमध्ये युवक काँग्रेसच्या बीफ पार्टीवरुन सुरु झालेला वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हं आहेत. आता या वादात केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही उडी घेतली असून, दिल्ली आणि नागपूरनं आम्ही काय खावं हे सांगू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अलप्पुझामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, ''केरळमधील नागरिकांची खाण्याची एक वेगळी परंपरा आहे. जे आरोग्यासाठी चांगले आणि पौष्टिक आहे, त्याला कोणीही बदलू शकत नाही. राज्यातील सरकार आपल्या नागरिकांना त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवेल. त्याबाबत केंद्र सरकार आणि (रा.स्व.संघाचं मुख्यालय असलेल्या) नागपूरने ठरवू नये,'' असंही ते म्हणाले.
दुसरीकडे विजयन यांनी यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पशुविक्रीच्या नव्या नियमावलीवर माझा आक्षेप आहे. ही जाचक नियमावली लवकरात लवकर हटवावी, जेणेकरुन लाखो शेतकरी संकटात सापडणार नाहीत. तसेच घटनेनं त्यांना बहाल केलेली मुलभूत हक्क देखील अबाधित राहतील.” असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
जनावरांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केल्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. केंद्राच्या नियमावलीचा विरोध करण्यासाठी कन्नूरमध्ये गोहत्या, तर तिरुअनंतपुरममध्ये डाव्यांची विद्यार्थी संघटना असलेल्या एसएफआयने काही ठिकाणी बीफ पार्टीचं आयोजन केलं होतं. याप्रकरणी केरळ पोलिसांनी गोहत्या करणाऱ्या युवक काँग्रेसच्या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे केरळचे कृषीमंत्री वीएस सुनील कुमार यांनी राज्य सरकार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं. तर केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यातल्या कम्यूनिस्ट पक्षाने 200 ठिकाणी बीफ पार्टीचं आयोजन केलं आहे.
केरळसोबतच तामिळनाडूमध्येही याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. कारण IIT मद्रासच्या 50 विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री बीफ पार्टीचं आयोजन केलं होतं. तसेच करुणानिधींच्या डीएमके पक्षानेही केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने केंद्र सरकारच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत बोलताना काँग्रेस आणि केरळमधील कम्यूनिस्ट पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.
संबंधित बातम्या
केरळ गोहत्या : युवक काँग्रेसच्या 16 सदस्यांविरोधात गुन्हा दाखल