मुंबई : दुबईहून केरळमध्ये येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान IX-1344 शुक्रवारी संध्याकाळी कोझीकोड विमानतळावर लँडिंग दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. विमानात एकूण 191 प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे. या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, अनेकांकडून अपघाताच्या कारणांबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यापैकी या अपघासाठी तीन कारणांची चर्चा होताना दिसत आहे. जाणून घेऊया या अपघातासाठी जबाबदार असणारी तीन कारणं...
1. टेबल टॉप रनवे
कोझीकोडच्या ज्या विमानतळावर हा अपघात झाला, तेथील रनवे हा टेबल टॉप रनवे आहे. साधारणपणे रनवेवर मध्यभागी देखील लाईट असते ज्याला सेंटर लाईट असं म्हटलं जातं. यामुळे रात्रीच्या वेळी लँडिंग करताना वैमानिकांना रनवेचा अंदाज येतो. परंतु, या रनवेवर सेंटर लाईट नव्हती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, टेबल टॉप रनवे म्हणजे काय? एखाद्या पठारावर हा रनवे असतो आणि हा रनवे जिथे सुरु होतो आणि जिथे संपतो अशा दोन्ही टोकांना दरीसारखा खोलगट भाग किंवा उतार असतो. याकारणामुळे कोझीकोडच्या विमानतळावर मोठी विमानं येत नसतं.
पावसाळ्यात तर हा रनवे आणखी धोकादायक ठरतो. कारण, खराब वातावरणामुळे या रनवेवर विजिबलिटी फार कमी असते, ज्यामुळे अपघाताची शक्यता आणखी वाढते. गुरुवारपासूनच कोझीकोडमध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की, याच कारणामुळे एअर इंडियाचं विमान लँड करताना पुढे निघून गेलं आणि अपघात झाला.
पाहा व्हिडीओ : केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 19वर; 170 प्रवासी बचावले
2. कोरोना संकट आणि योग्य ट्रेनिंग नसणं
प्रत्येक वैमानिकाची वर्षातून दोन वेळा ट्रेनिंग होते. या ट्रेनिंगमध्ये जे पायलट फिट असतात, त्यांनाच उड्डाणं करण्यासाठी परवानगी देण्यात येते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ट्रेनिंग 30 सप्टेंबरपर्यंत कॅन्सल करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा आहे की, जे वैमानिक विमान उडवण्यासाठी फिट नाहीत. ते देखील काम करत आहेत. त्यामुळे कोझीकोड विमान दुर्घटनेचं हेदेखील एक कारण असू शकतं.
3. मानसिक तणाव
अपघाताच्या एक दिवस अगोदर म्हणजेच, गुरुवारी वैमानिकांच्या वेतनात जवळपास 60 टक्के कपात करण्यात आली आहे. अशात असं असू शकतं की, मानसिक तणावामुळे हा अपघात घडला असले.
वरील तीनही कारणं केवळ अंदाज म्हणून सांगण्यात येत असून अपघाताचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अपघाताचं रेस्कू ऑपरेशन पूर्ण झालं असून या अपघातात वैमानिकांसह 19 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 171 जण बचावले.
महत्त्वाच्या बातम्या :