Kedarnath Yatra Yellow Alert : चार धाम यात्रा करणाऱ्या भाविकांना आता पुढील काही दिवस प्रवासात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बदलत्या हवामानामुळे प्रवाशांना हा त्रास होण्याची शक्यता आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने केदारनाथ यात्रेसाठी हवामानाबाबत यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.


20 मे पर्यंत पावसाची शक्यता
मंगळवारी उत्तराखंडमध्ये दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत अलर्टही जारी केला होता. विशेषत: मंगळवार आणि बुधवारी राज्यातील डोंगराळ भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. बुधवारी पुन्हा एकदा रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनानेही यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे, "IMD ने 20 मे पर्यंत रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्यांमध्ये वीज आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज जारी केला आहे."


 






'या' चार जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी 
मंगळवारीही हवामान खात्याने पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला होता. ज्यामध्ये विभागाने रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, चमोली आणि बागेश्वरमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली होती. यासोबतच या भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील, असेही हवामान विभागाने सांगितले होते. त्याचवेळी डेहराडूनसह अनेक मैदानी भागातही मंगळवारी पाऊस झाला. तर गेल्या काही आठवड्यांपासून पडणाऱ्या उष्णतेपासूनही नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


सतर्क राहण्याच्या सूचना


यात्रेसह इतर पर्यटन स्थळांवर येणार्‍या पर्यटकांनी पाऊस पडल्यास एखाद्या थांब्यावर आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच प्रवासाशी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 16 ते 20 मे दरम्यान रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन केदारनाथ यात्रेबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचे जिल्हा दंडाधिकारी मयूर दीक्षित यांनी सांगितले. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्यास सांगण्यात आले आहे. पाऊस पडताच त्यांना थांबा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी यात्रेशी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस दलाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.