नवी दिल्ली : काश्मीरमध्ये सैन्य आणि स्थानिकांमधील वादात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका बाजूला काश्मिरी लोकांना दहशतवादी मारतात, तर दुसरीकडे सैन्य, असं वक्तव्य करत दिग्विजय सिंहांना नवा वाद ओढवून घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि स्थानिक लोकांमध्ये वाद सुरु आहे. याच वादातून सैन्यावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसंच सैन्यानं दगडफेक रोखण्यासाठी थेट स्थानिक तरुणाना जीपवर बांधल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर टीका करताना दिग्विजय सिंहांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.
काय आहे प्रकरण?
9 एप्रिलला श्रीनगरमध्ये पोटनिवडणुकीची ड्युटी संपवून सीआरपीएफचे जवान निघाले होते. त्यावेळी काश्मिरच्या फुटीरतावाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देशवासियांची तळपायाची आग मस्तकात गेली.
पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारलं. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे.
विशेष म्हणजे हे फुटीरतावादी तरुण मारत असताना, हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत होते. ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नाहीत. कारण दुश्मानाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे.