Sanna Irshad Mattoo : काश्मिरी पत्रकार (Kashmiri Journalist) सना इर्शाद मट्टू (Sanna Irshad Mattoo) यांना दिल्ली विमानतळावर परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize) स्वीकारण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार्‍या काश्मिरी पत्रकार सना इर्शाद मट्टू यांना दिल्ली येथे इंदिरा गांधी विमानतळावर (Indira Gandhi International Airport) जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे पुलित्झर पुरस्कार सोहळ्याला त्या अनुपस्थित होत्या. सना यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेची माहिती दिली आहे. 


काश्मिरी पत्रकार सना इर्शाद मट्टू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. शिवाय अमेरिकेच जाण्यापासून रोखण्यामागचं कोणतही कारण यंत्रणांनी दिलेलं नाही. त्याच्यासोबत हे दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. दुसऱ्यांदा त्यांना परदेश दौऱ्यापासून रोखण्यात आलं आहे. 


सना यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेल्या इमिग्रेशन काउंटरवरून क्लिअरन्ससाठी जेव्हा सना दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. तेव्हा त्यांचा बोर्डिंग पास रद्द करण्यात आला. एअरपोर्ट प्रशासनाने बोर्डिंग पास रद्द करण्यामागचं कारण सांगितलेलं नाही. 






न्यूयॉर्कमधील पुलित्झर पुरस्कार सोहळ्यासाठी जात होत्या


सना यांनी सांगितलं की, पुलित्झर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांना न्यूयॉर्कला जायचे होते. या प्रवासासाठी लागणारी सर्व कागदपत्रेही त्याच्याकडे होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी सना यांच्यावर घातलेल्या निर्बंधांमुळे त्यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आलं. सना इर्शाद मट्टू या फोटो जर्नलिस्ट (Photo Journalist) आहेत. त्यांना कोरोनाच्या काळात फोटोग्राफीसाठी पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.


या आधीही परदेशात जाण्यापासून रोखलं


यापूर्वी 2 जुलै रोजी सना यांना पॅरिसला जाण्यापासून दिल्ली विमानतळावर रोखण्यात आलं होतं. सना एका पुस्तक प्रकाशन आणि छायाचित्र प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पॅरिसला जाणार होत्या. मात्र त्यावेळी त्यांना रोखण्यात आलं.


सना यांच्या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रिया


सना यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सना यांना परदेशात जाण्यापासून रोखण्याच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी आणि खेद व्यक्त केला आहे. या निर्णयाविरोधात तुम्ही न्यायालयात जा, असे एका नेटकऱ्याने सुचवलं आहे.