श्रीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज माध्यमांशी बोलताना सिंह म्हणाले की, "काश्मीर प्रातांतील सर्व समस्या सोडवल्या जातील. जगातील कोणतीही ताकद आता आपल्याला रोखू शकत नाही".


संरक्षणमंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, "आम्हाला बातचित करुन प्रश्न सोडवायचे आहेत. जर कोणाला बातचित करुन प्रश्न सोडवायचे नसतील तर आम्हाला चांगलंच ठाऊक आहे की, हे प्रश्न कसे सोडवायचे असतात".

माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजनाथ सिंहांना दहशतवादाबाबत प्रश्न विचारले. यावर सिंह म्हणाले की, "दहशतवादाचा प्रश्न सोडवण्यासाठी इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्र येत आहे. त्यामुळे आता काश्मीरसह संपूर्ण जगाला दहशतवादापासून मुक्ती मिळेल असा मला विश्वास आहे".

सिंह यांनी यावेळी फुटिरतावादी आणि काश्मीरमधील आंदोलकांना चर्चेसाठी समोर येण्याचे आवाहन केले आहे. आपण एकत्र येऊन सर्व प्रश्न सोडवू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

राजनाथसिंह यांनी आज जम्मू-काश्मीरमधल्या द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली. तिथे शहीद जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी 'वीरभूमी'ला भेट दिली. तसेच कठुआमधील उंज आणि सांबा जिल्ह्यातील बसन्तर येथे बांधण्यात आलेल्या दोन पुलांचे लोकार्पणदेखील सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.