लुधियाना : जगातील सर्वात वयस्कर महिला ठरण्याचा मान भारतीय महिलेने पटकावला आहे. पंजाबच्या करतार कौर या हयात असलेल्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहेत. त्या 118 वर्षांच्या आहेत.

करतार कौर यांच्या नावाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार आहे. आतापर्यंत जपानच्या काने तानाका सर्वात वयोवृद्ध महिला मानल्या जात होत्या. काने यांचं वय 116 वर्ष 63 दिवस इतकं आहे. मात्र करतार कौर त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत.

भावाच्या वयावरुन करतार यांचं वय काढण्यात आलं. करतार यांचा जन्म 1901 साली झाला होता. आपली पणजी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला असल्याची आपल्याला कल्पना होती, मात्र तिला दृष्ट लागू नये, यासाठी आपण ही गोष्ट लपवून ठेवल्याचं त्यांच्या पणतूने सांगितलं.

काही दिवसांपूर्वी करतार यांच्या ह्रदयात ब्लॉक असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर फिरोजपूरमधील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. रवींद्र सिंह कूका यांनी करतार यांच्यावर हार्ट सर्जरी केली. सध्या करतार यांची प्रकृती स्थिर आहे.
सर्वात वयोवृद्ध व्यक्तीवर पेसमेकर इम्प्लान्ट करण्याचा विक्रमही डॉक्टरांच्या टीमने केला आहे.

करतार यांनी आपल्या नातवंडांची नातवंडं म्हणजेच पाच पिढ्या पाहिल्या आहेत. त्यांची मुलगी 88 वर्षांची आहे. करतार या पूर्णपणे शाकाहारी आहेत.