कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला बदडलं
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2018 08:44 AM (IST)
कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या कर्नाटकातील बँक अधिकाऱ्याला महिलेने भररस्त्यात दांडक्याने बदडलं.
दावणगिरी (कर्नाटक) : एकीकडे मीटू चळवळीमुळे देशभरातील महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत, तर कर्नाटकात एका महिलेने दुर्गेचा अवतार धारण केला. कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला महिलेने भररस्त्यात दांडक्याने बदडलं. संबंधित महिलेने बँकेत 15 लाख रुपयांचं कर्ज मागितलं होतं. मात्र ते मंजूर करण्यासाठी बँकेच्या एका अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. भडकलेल्या महिलेने त्याला भररस्त्यात 'प्रसाद' दिला. बंगळुरुपासून 260 किमी दूर, कर्नाटकातील दावणगिरी शहरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत महिला बँकेच्या अधिकाऱ्याच्या कॉलरला पकडून दांडक्याने मारत आहे, तर मध्येच श्रीमुखात भडकावून लाथाही मारताना दिसत आहे. त्याला पोलिसांकडे येण्यासही ती बजावते. 'तुम्हाला ज्याचं चित्रण करायचं आहे, ते करा, मी कोणाला घाबरत नाही. मी जे करते, त्यात काहीच वावगं नाही' असं ती महिला कन्नडमध्ये बोलताना ऐकू येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक जणांनी तिचं कौतुक केलं आहे. ही महिला 'मीटू' चळवळीचं जिवंत उदाहरण असल्याचंही काही जण म्हणतात.