नवी दिल्ली : चंद्र आणि तारा असणाऱ्या हिरव्या रंगाच्या झेंड्यावर बंदी आणण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याबाबत सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर मागवलं आहे. उत्तर प्रदेशचे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी या झेंड्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. या झेंड्याचा मुस्लीम धर्माशी काहीही संबंध नाही. या झेंड्यावरुन अनेकदा विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होते.
गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सरकारकडून उत्तर मागवलं होतं. त्यावेळी न्यायायलयाने म्हटलं होतं की, अनेकदा सरकारला काही मुद्द्यांवर भूमिका घेणे कठीण असतं. हेतूपुरस्कर एखादा निर्णय घेतल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भीती सरकारला असते. त्यामुळे सरकारला याबाबत काही बोलायचं असेल तर ते आपली भूमिका मांडू शकतात. सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाकडे दोन आठवड्यांची वेळ मागितली आहे.
चंद्र आणि तारे असलेल्या हिरव्या झेंड्याचा इस्लामशी काहीही संबध नाही. पैंगबर मोहम्मद मक्का येथे गेले होते, त्यावेळी त्यांच्या हातात सफेद झेंडा होता. चंद्रा, तारे असणारे हिरवे झेंडे 1906 पूर्वी अस्तित्वातचं नव्हते, असं रिझवी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
या झेंड्यांचा वापर करुन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत असतात. काही अज्ञात लोकांकडून मुस्लीम वस्तीत हे झेंडे लावले जातात. अनेकदा हिंदू लोक याला पाकिस्तानी झेंडा समजतात आणि त्यामुळे वाद निर्माण होतात, असंही रिझवी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
अशाप्रकारे झेंड्याचा गैरवापर करुन समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन सामाजिक वातावरण दुषित करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही रिझवी यांनी केली आहे.