Karnataka Congress: कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री (Karnataka Chief Minister) कोण असेल याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बेंगळुरूमध्ये बोलवण्यात आली होती. ही बैठक संपली असून या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात आली नाही. बैठकीत उपस्थित असलेल्या काँग्रेस आमदारांनी (Congress MLA) विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्याचे अधिकार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना देण्याचा ठराव मंजूर केला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, तर गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत जाऊन खर्गे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. हे दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. कर्नाटकात काँग्रेसने 135 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे.
डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. बंगळुरू येथील हॉटेल शांग्री-ला येथे काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना बाहेर दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापल्या नेत्यांच्या बाजूने घोषणा देत होते. यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, 'आज विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून हा अहवाल हायकमांडला सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास हायकमांडला वेळ लागणार आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र सिंह आणि माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. या निरीक्षकांनी नवनिर्वाचित आमदारांची चर्चा घेत त्यांचे मत जाणून घेतले. त्याचा अहवाल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला सादर करण्यात येणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा
शनिवारी झालेल्या मतमोजणीत, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला. शनिवारी रात्री त्यांनी आपला राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही हा जनादेश स्वीकारला आहे. आमच्यातील उणीवा दूर करून पुन्हा एकदा पक्ष संघटना उभी करू आणि लोकसभेत यश मिळवू असे बोम्मई यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कमी झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. कदाचित काँग्रेसने आमच्यापेक्षा अधिक चांगले प्रयत्न आणि रणनीती आखल्याने त्यांनी यश मिळवले असू शकते, असेही बोम्मई यांनी म्हटले.