Congress MLA Controversial Remarks on Rape :  कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार के. आर. रमेश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले. विधानसभेत मुसळधार पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानीची चर्चा सुरू होती त्यावेळी त्यांनी 'जेव्हा बलात्कार होणारच हे स्पष्ट होत असेल तेव्हा विरोध करण्यापेक्षा आनंद घ्या' असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर रमेश कुमार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. 


विधानसभेत मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा सुरू होती. प्रत्येक आमदार आपल्या भागात झालेल्या नुकसानीची माहिती सभागृहाला देण्यासाठी प्रयत्न करत होते. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे या चर्चेसाठी फार वेळ नव्हता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही चर्चा पूर्ण करायची होती. तर, आमदारांकडून चर्चेची वेळ वाढवण्यासाठी आग्रही मागणी सुरू होती. 


त्यावेळी कागेरी यांनी हसत म्हटले की, मी अशा स्थितीत आहे, जिथे मला मजा घ्यायची आहे आणि हो-हो करायचे आहे. सभागृहाची कार्यवाही व्यवस्थित चालवायची आहे आणि सदस्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले पाहिजे. सभागृहाचे कामकाज होत नाही अशी तक्रारही त्यांनी मांडली. त्यावर आमदार रमेश कुमार यांनी यावर हस्तक्षेप करताना म्हटले की, एक म्हण आहे, जर, बलात्कार होणार असेलच तर निमूटपणे झोपा आणि आनंद घ्या, सध्या तुम्ही (विधानसभा अध्यक्ष) त्याच स्थितीत आहात. रमेश कुमार यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. धक्कादायक म्हणजे विधानसभा अध्यक्षांनीदेखील या वक्तव्यावर हसून प्रतिसाद दिला. 


 






रमेश कुमार यांच्या वक्तव्यावर विधानसभा सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका सुरू आहे.