Umesh Katti Death News: कर्नाटकचे अन्न नागरी पुरवठा आणि वनमंत्री उमेश कत्ती (61) (Umesh Katti News)यांचे बंगळुरु येथे मंगळवारी रात्री निधन झाले. बंगळुरु येथील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी बाथरूममध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना एम.एस.रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि आठ वेळा ते निवडून आले होते.
स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी त्यांनी वेळोवेळी केली होती. जनता दलाच्या तिकिटावर पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली होती. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निधनामुळे बेळगाव जिल्ह्यातील शाळा, कॉलेजना आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे पार्थिव सकाळी बेळगावला आणण्यात येणार असून नंतर त्यांच्या मूळ गावी बेल्लद बागेवाडी येथे नेण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान मोदी यांनी उमेश कत्ती यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, उमेश कत्ती हे एक अनुभवी नेते होते. ज्यांनी कर्नाटकच्या विकासात भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंबियांसोबत आहोत, ओम शांती, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.