बंगळुरु : कर्नाटकमध्ये 15 विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल तर दुपारपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालावर अवघ्या चार महिन्यांपूर्वीच स्थापन झालेल्या येडियुरप्पा सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पोटनिवडणुकीत भाजपला कमीत कमी सहा जागांवर विजय आवश्यक आहे, जेणेकरुन सभागृहात बहुमत कायम राहिल. कर्नाटक पोटनिवडणुकीत अठानी, कगवाड, गोकाक, येलापूर, हिरेकेरुर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापुर, के.आर. पुरम यशवंतपुरा, महालक्ष्मी लेआऊट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर जागांवर मतदार झालं आहे.


कर्नाटकमध्ये 6 डिसेंबरला 15 विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. तर आज (9 डिसेंबर) सकाळी मतमोजणी होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता.

कर्नाटकमध्ये मतदानानंतर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला 15 पैकी 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर असेच निकाल आले तर भाजप सरकारच्या डोक्यावर संकट निघून जाईल. मात्र 6 पेक्षा कमी जागांवर विजय मिळाला तर राज्यात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण होईल. या 15 पैकी 12 जागा काँग्रेस तर 3 जागा जेडीएसने जिंकल्या होत्या.

224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत. काँग्रेसचे 66 आणि जेडीएसचे 34 आमदार आहेत. याशिवाय बसपाचाही एक आमदार आहे. या निकालावर काँग्रेसचीही नजर आहे. कारण काँग्रेसच्या नेत्यांनी जेडीएससोबत पुन्हा एकदा युतीचे संकेत दिले आहेत. निकालानंतर बहुतांश गोष्टी बदलतील, असं बी.के. हरीप्रसाद म्हणाले.

बी एस येडियुरप्पा यांचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेस-जेडीएस सरकारमधील काँग्रेसच्या 14 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. परिणामी सरकार कोसळलं होतं. माजी विधानसभा अध्यक्षांनी सर्व बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं होतं. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 15 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. तर दोन जागांबाबत हायकोर्टात खटला सुरु आहे.

दरम्यान, विजयासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी भगवान मंजूनाथ मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. येडियुरप्पा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आणि पुढील साडेतीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी विशेष पूजा-अर्चाही केली. याशिवाय 15 पैकी 13 जागा भाजपला मिळतील तर उर्वरित दोन जागा काँग्रेस आणि जेडीएसला मिळतील, असा दावा त्यांनी केला. तसंच काँग्रेस आणि जेडीएस प्रशासन चालवण्यासाठी आमची मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला,

तर दुसरीकडे जेडीएसचे नेते आणि माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांनीही शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी लीन झाले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे विधानपरिषद सदस्य टी ए श्रवण उपस्थित होते.

(येडियुरप्पांनी सरकार स्थापन केला तेव्हाचा व्हिडीओ)