Accident News: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात रायचूर- कारवार मार्गावर अपघाताची  एक गंभीर घटना समोर आली आहे. रायचूर-कारवार केएसआरटीसी बस अनियंत्रित होऊन अंकोला तालुक्यातील वज्रळी येथील नवमी हॉटेलजवळ नॅशनल हायवे 63 वर दरीत कोसळली. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश होता. (Raichur Karwar Highway) राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून मुंबई गोवा मार्गावर केमिकल ट्रक पलटी झाला असून कराड-विटा मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Continues below advertisement

अतिवेग नडला, बस थेट कोसळली दरीत 

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाचा अतिवेग हा अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बस अचानक अनियंत्रित झाल्यानंतर चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि बस थेट दरीत कोसळली. अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यल्लापूर आणि अंकोला पोलिसांनीही तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढण्यात मदत केली.

जखमी प्रवाशांना तातडीने अँब्युलन्सद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाची नोंद अंकोला पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही अपघातांच्या मालिका घडताना दिसत आहेत.

Continues below advertisement

कराड-विटा मार्गावर भीषण अपघात; 2 मृत्यू 

कराड-विटा मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशन ब्रिजजवळ ही धडक एवढी जोरदार होती की नेक्सन कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नेक्सन कार आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ओमकार थोरात (28) आणि गणेश थोरात (25) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघेही कराड तालुक्यातील ओंड गावचे रहिवासी होते. घटनेत ऋषिकेश थोरात आणि रोहन पवार हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई गोवा हायवेवर केमिकलने भरलेला टँकर पलटी

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे पुन्हा एकदा टँकरचा अपघात झाला असून त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. गोव्याहून मुंबईकडे जाणारा केमिकल वाहतूक करणारा टँकर हातखंबा येथील चढावर पलटी झाला. टँकरमध्ये कीटकनाशक असल्याची माहिती मिळाली असून केमिकल गळतीचा धोका नसल्याचं सांगण्यात येतंय. टँकर हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. टँकर रस्त्यावर आडवा पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.