बंगळुरु : कर्नाटकातील राजकीय नाट्य अजून थांबलेलं नाही. कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केलं आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांनी तीन आमदारांना अपात्र घोषित केलं होतं.


त्यामुळे काँग्रेस-जेडीएसच्या अपात्र आमदारांची संख्या आता 17 झाली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयमुळे आता आमदार 15 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत निवडणूक लढू शकणार नाहीत.





अपात्र घोषित केलेल्या आमदारांमध्ये 13 काँग्रेस, जेडीएसचे 3 आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करता न आल्याने सरकार पडलं होतं. त्यानंतर बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. येडियुरप्पा यांना उद्या बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.


कर्नाटक विधानसभेचं संख्याबळ 224 आहे. 17 आमदारांना अपात्र घोषित केल्यानंतर आता विधानसभेत आमदारांची संख्या 207 वर आली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 104 आमदारांची आवश्यकता आहे. कुमारस्वामी सरकारला बहुमत चाचणीत केवळ 99 मतं मिळाली होती. तर भाजपला 105 मतं मिळाली होती. या आधारावर भाजपला उद्या बहुमत सिद्ध करण्यात अडचण येणार नाही.


कर्नाटकात सत्ता आल्यानंतर भाजप विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबत विचार करत आहे. विधानसभा अध्यक्षांनी स्वत: राजीनामा न दिल्यास भाजप हे पाऊल उचलू शकतं. विधानसभा अध्यक्षांना पद सोडण्याबाबत सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


संबंधित बातम्या