Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागणार आहेत. मात्र त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची (भाजप) चिंता वाढवली आहे. एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बहुतांशी एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 110 ते 140 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यादृष्टीने कर्नाटक निवडणुकीला मोठं महत्त्व आहे.
2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या दृष्टिकोनातूनही कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. एक्झिट पोलचे अंदाज निकालात बदलले तर भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल. कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर 2024 च्या निवडणुकीत 'मिशन 400' समोर अधिक आव्हाने निर्माण होतील.
2024 मध्ये अडचणींना सामोरे जावे लागणार?
कर्नाटकमध्ये जागा घटण्याची भीती
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यास भाजपच्या लोकसभेतील जागा घटण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये कर्नाटकमधील 28 पैकी 25 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. तर, एका जागेवर भाजपने पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाला होता. काँग्रेस-जेडीएसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. कर्नाटक विधासभेत पराभव झाल्यास भाजपला ही कामगिरी पुन्हा करणे अवघड राहू शकते. तर, काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.
इतर राज्यात फटका
कर्नाटकसोबतच पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्रातही भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. या राज्यांतील जागांचा तोटा भरून काढण्यासाठी भाजपला नवीन राज्ये शोधावी लागतील. त्याची शक्यता कमी दिसते.
पाच राज्यात 172 जागा
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 18, महाराष्ट्रात 48 पैकी 23, कर्नाटकात 28 पैकी 25, बिहारमध्ये 40 पैकी 17, झारखंडमध्ये 14 पैकी 12 जागा जिंकल्या. या पाच राज्यातील 172 जागांपैकी भाजपने 98 जागांवर विजय मिळवला होता. तर, मित्र पक्षांनी 42 जागांवर विजय मिळवला. या पाच राज्यात 172 पैकी 140 जागांवर भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएने विजय मिळवला होता,
भाजपचे समीकरण बिघडले?
लोकसभेच्या 48 जागा असणाऱ्या महाराष्ट्रात आणि 40 जागा असणाऱ्या बिहारमध्ये भाजपसमोर अधिक आव्हाने आहेत. भाजपने आपले मित्रपक्ष गमावले आहेत. महाविकास आघाडीमुळे भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी किमान 34 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणात समोर आले होते. तर, बिहारमध्ये नितीशकुमार हे महाआघाडीत आल्याने आता भाजपसमोर अधिक आव्हान निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालमध्येही 2019 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण दिसत आहे.
दक्षिण भारतात धक्का
आंध्र प्रदेश, केरळ, पाँडिचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये भाजपला मोठं यश मिळालं नाही. दक्षिणेकडील सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत. एकूण लोकसभेच्या जागांपैकी सुमारे 25 टक्के आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण भारत राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपला जागा मिळाल्या, परंतु उर्वरित दक्षिणेकडील राज्यांमध्ये जागा मिळाल्या नाहीत. कर्नाटकच्या माध्यमातून भाजपला दक्षिणेत पाय पसरवायचे आहेत, मात्र कर्नाटकातच धक्का बसला तर तेलंगणा, आंध्र प्रदेशसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठा राजकीय फटका बसू शकतो.