कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 बंगळुरु: विधानसभा निवडणूक निकालानंतर आज कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. कारण भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.


कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने कर्नाटकात मोठा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता आला नाही.

कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं.

यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या आहेत.  तर काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

  • भाजप 104

  • काँग्रेस 78

  • जनता दल (सेक्युलर) 37

  • बहुजन समाज पार्टी 1

  • कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

  • अपक्ष 1


एकूण 222

LIVE UPDATE




  • भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सरकार स्थापन करण्याची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे.

  • भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा उद्या म्हणजेच गुरुवारी सकाळी 9.30 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला 21 मेपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती आहे.

  • काँग्रेस-जेडीएसचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा कुमारस्वामी यांचा दावा, राज्यपालांकडे सत्तास्थापनेची संधी देण्याची मागणी, कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याची राज्यापालांची हमी

  • मला दोन्ही बाजूची ऑफर. मात्र 2004 आणि 2005 मध्ये मी भाजपसोबत गेल्याने, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीवर काळा डाग पडला. देवाने मला तो डाग पुसण्याची संधी दिली आहे. मी आता काँग्रेससोबत जाणार आहे : कुमारस्वामी

  • जेडीएस आमदारांच्या बैठकीत एचडी कुमारस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

  • कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपच्याच बाजूने जाणार, पण सत्ता आहे म्हणून भाजपने दुरुपयोग करु नये. भाजपची सुद्धा वेळ येणार आहे, सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार : राज ठाकरे

  • पक्षाने माझी विधीमंडळ नेतेपदी निवड केली. त्याबाबतचं पत्र राज्यपालांना दिलं. मला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल आमंत्रित करतील अशी आशा आहे - येडियुरप्पा

  • एचडी कुमारस्वामीच कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील आणि हे आघाडीचं सरकार असेल. हेच सत्य आहे. आम्ही कोणाच्या प्रभावाखाली येणार नाही : जेडीएस

  • राज्यपाल येडियुरप्पा यांनाच सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करणार, सूत्रांनी माहिती दिल्याचा भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा

  • जेडीएसच्या बैठकीत पक्षाचे दोन आमदार अनुपस्थित, तर काँग्रेसचे चार आमदारही बैठकीला गैरहजर, काँग्रेसचे 78 पैकी 60 आमदार सध्या उपस्थित

  • बीएस येडियुरप्पा यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता : सूत्र

  • बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या जेडीएसच्या बैठकीत आमदार राजा वेंकटप्पा आणि वेंकर राव नाडगौडा गैरहजर - ANI

  • भाजप आमदारांकडून येडियुरप्पांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड, भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार

  • भाजपच्या घोडेबाजाराची धास्ती, काँग्रेस आपल्या आमदारांना विशेष विमानाने बंगळुरुला घेऊन जाणार, सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

  • कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसकडून सावध पावलं, सर्व आमदारांसाठी ईगल्टन रिसॉर्टमध्ये 100 रुम बूक, गुजरातच्या आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं, त्याच रिसॉर्टमध्ये कर्नाटक काँग्रेसचे आमदार

  • बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आता भाजपनं फोडाफोडीचं राजकारण सुरु केल्याचा गंभीर आऱोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केलाय. काही आमदारांना मंत्रिपदाची तर काहींना पैशांची लालूच दाखवली जातेय. मात्र अशा प्रलोभनांना बळी न पडणाऱ्यांना भाजपनं थेट आयटी आणि ईडीच्या धाडी टाकण्याची धमकी दिल्याचंही काँग्रेसनं म्हटलंय.

  • भाजप नेत्यांकडून मला फोन आला. मला मंत्रिपदाची ऑफर दिली. मात्र मी त्यांना नकार कळवला: काँग्रेस आमदार

  • सरकार स्थापन्याबाबत तीळमात्र शंका नाही. आम्ही 100 टक्के सरकार स्थापन करणार. कालच निकाल आला आहे. तो केवळ एक दिवस होता. येत्या काही दिवसात कर्नाटकात काय काय घडतंय ते पाहा: के एस ईश्वरप्पा, भाजप

  • काँग्रेस आणि जेडीएसकडूनही सत्ता स्थापनेचा दावा

  • भाजपकडून हालचालींना वेग, आज विधीमंडळ पक्षाची बैठक


कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. म्हणजेच भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.

दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने सर्वात कमी जागा मिळालेल्या जेडीएसला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.

त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस मिळून सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला आहे.