हैदराबाद: कर्नाटकमधील शिवमोगा येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 12 जणांचा तुंगभद्रा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील सातजणांचे मृतदेहाचे बाहेर काढण्यात यश आले असून, इतर मृतदेहांचा शोध सुरु आहे.
बंगळुरुपासून तीन किलोमीटरवर असलेल्या शिवमोगा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. गणपती विसर्जनासाठी एकूण 35 जण थेपा नावाच्या नावेतून तुंगभद्रा नदीच्या मध्यभागी गेले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नावेमध्ये प्रमाणापेक्षा अधिक लोक असल्याने ही नाव मध्येच पलटली.
नावेतील सातजणांना नाव पलटी होण्याच्या शक्यतेचा अंदाज आल्याने त्यांनी तात्काळ नदीत उडी मारून आपला जीव वाचवला. यानंतर पंधरा सेकंदाच्या आत नावेमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. अन् ज्यांना पोहायला येत नव्हते, त्या 12 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे समजते.
यातील सातजणांचे मृतदेह हाती लागले असून, उर्वरित मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. मात्र, रात्री अंधार पडल्याने हे काम थांबवण्यात आले. पण आज सकाळपासून पुन्हा शोध कार्याला सुरुवात झाली.