नवी दिल्ली : दिल्लीत कावड वाहणाऱ्या भक्तांना गाडीचा धक्का लागल्याचा प्रचंड राग आला. त्यामुळे त्यांनी चक्क गाडीची तोडफोड करुन ती उलटवली. दिल्लीतील मोतीनगर परिसरात कावड घेऊन जाणाऱ्या भक्तांनी थैमान घातलं. रस्त्यावरून चालताना एका गाडीचा धक्का लागला आणि वादाची ठिणगी पेटली. कावड नेणाऱ्यांनी आधी गाडीत बसलेल्या तरुण-तरुणीला बाहेर काढलं. त्यानंतर काठ्यांनी गाडीला फोडायला सुरुवात केली. गाडीच्या काचा, दरवाजे फोडून तिचा चक्काचूर केला. अखेर गाडी एका बाजूला उलटवली. सुदैवाने गाडीतील प्रवाशांना दुखापत झालेली नाही. डझनभर कावड वाहणाऱ्यांनी ही तोडफोड केल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. विशेष म्हणजे ते पोलिसांनाही जुमानत नसल्याचं दिसलं. शिवभक्त दरवर्षी कावड यात्रा करतात. आपल्या घरापासून उत्तराखंडातील हरिद्वार, गौमुख, गंगोत्रीपर्यंत ते पायी यात्रा करतात. गंगा नदीचं पवित्र पाणी कावडीतील मडक्यात भरुन ठेवतात. श्रावणात अमावस्या, प्रतिपदा किंवा शिवरात्रीला ते पाणी अर्पण करतात. अनेक शिवभक्त दरवर्षी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेशातून येतात. सरकार आणि पोलिसांकडून दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था पाळली जाते. दिल्ली-हरिद्वार महामार्गावरील वाहतूकही वळवण्यात येते.