प्रयागराज : सासू आणि दोन मेव्हण्यांची हत्या केल्याच्या आरोपातून जावई आणि त्याच्या दुसऱ्या बायकोची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. कानपूरच्या ट्रायल कोर्टाने उत्तर प्रदेशातील राशिदला फाशी, तर शकीला हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती डीके सिंह यांच्या खंडपीठाने राशिद आणि शकीला यांना दोषमुक्त केलं. कानपूर कोर्टाने निकाल देताना चूक केल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. आरोपींविरोधातील साक्ष संशयास्पद असल्यामुळे सिद्ध होऊ शकत नाही.

काय आहे प्रकरण?

कानपूरमधील फरहत एंटरप्राईझेसच्या फॅक्टरीमध्ये 6 मार्च 2013 रोजी तीन मृतदेह आढळले होते. फॅक्टरीचे सुरक्षारक्षक राशिद आणि त्याची पत्नी शकीला घटनास्थळावरुन गायब होते. तिघांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. हे मृतदेह राशिदची सासू झेनब आणि मेहुणे रियाज आणि इब्राहिम यांचे असल्याचं नंतर समोर आलं.


फरहत एंटरप्राईझेसचा मालक आणि मृतदेह सर्वप्रथम पाहिलेला मोहम्मद कामरानने पोलिसात तक्रार दाखल केली होती. राशिद आणि शकीला यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. हत्येच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या राशिदच्या अल्पवयीन (सहा वर्षीय) मेहुण्याची साक्ष घेण्यात आली होती. इतरही साक्षीदारांनी जबाब नोंदवला होता.

अल्पवयीन साक्षीदाराची साक्ष इतर साक्षीदारांसोबत जुळत नसल्याचं कोर्टाने सांगितलं. तिघांची हत्या आरोपीने एकट्याने केल्याचं सिद्ध करण्यासाठी ही साक्ष पुरेशी नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यानंतर दोघांची शिक्षा माफ करत त्यांची सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले.