Kamal Nath, Madhya Pradesh News : महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त समोर आले आहे. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांनी एक्स (ट्विटर)वरुन काँग्रेस पक्षाचं नाव काढले आहे, त्यामुळे या वृत्ताला आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. आता महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर ऐन लोकसभा निवडणुकीआधी हा काँग्रेसला मोठा फटका असेल.
कमलनाथ यांच्यासोबत 10 आमदार?
मिळालेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कमलनाथ यांच्यासोबत दहा आमदार आणि तीन महापौरही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांच्यासोबत त्यांचा मुलगा खासदार नकुलनाथही भाजपमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या वृत्तनुसार, कमलनाथ समर्थक नेत्यांसह दिल्लीला रवाना झाले आहेत.
मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले ?
मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा (VD Sharma) यांनी कमलनाथ यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, जर मध्यप्रदेशमधील कोणता नेता समजहितासाठी आमच्यासोबत येत असेल तर त्यांचं स्वागत आहे. कमलनाथ यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी भाजपची दारं खुली आहेत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार, या चर्चेला उधाण आले आहे. यादरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसनं राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आमंत्रण नाकारलं होतं. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते नाराज होते. काँग्रेसनं भगवान रामाचा अपमान केला, त्याचं काँग्रेसमधील नेत्यांना दु:ख झालं . ज्यांना त्याचं वाईट वाटलं, त्यांना संधी द्यायला हवी. ज्यांना राजकारणात राहून विकास करायचं आहे, ते जर आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, असे वीडी शर्मा म्हणाले. त्यांना कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आला होता.
आणखी वाचा :
चिपळूणमधील राड्यानंतर वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ, कोकणातील राजकीय वातावरण तापलं