नवी दिल्ली : न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांची भारताचे 44 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायमूर्ती जेएस खेहर यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. न्यायमूर्ती टी एस ठाकूर मंगळवारीच सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त झाले होते.
न्यायमूर्ती खेहर हे देशाचे पहिले शीख सरन्यायाधीश आहे. न्यायमूर्ती खेहर यांचा कार्यकाळ आठ महिन्यांचा असेल. 28 ऑगस्ट 2017 पर्यंत ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडतील. खेहर यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते.
कोण आहेत न्यायमूर्ती जेएस खेहर?
64 वर्षीय न्यायमूर्ती जेएस खेहर यांचं संपूर्ण नाव जगदीश सिंह खेहर आहे. खेहर हे अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला तर पंजाब विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. सप्टेंबर 2011 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. जेएस खेहर अतिशय कठोर प्रशासक असून त्यांना वेळेचा अपव्यय करणं आवडत नाही.
वकिलांशीही ते कठोर वागतात. पूर्ण तयारीनिशी न आल्याने अनेक वकिलांना त्यांच्या तिखट शब्दाचा मार खावा लागला आहे. वकिलाने त्याची कागदपत्रे योग्यरित्या सादर न केल्याने सुनावणीदरम्यान खेहर कोर्टाबाहेर गेले होते.
वकील म्हणून शानदार करिअर करणारे जेएस खेहर 1999 मध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. 2010 मध्ये मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश पी डी दिनाकरन यांच्याविरोधात तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधीशांच्या समितीत त्यांचा समावेश होता. त्यावेळी ते स्वत: कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते.