गुरुग्राम (हरियाणा) : सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सुरक्षारक्षकानेच न्यायाधीशाच्या पत्नी आणि मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना हरियाणात घडलीय. यात न्यायाधीशाच्या पत्नीचा मृत्यू झालाय. काल संध्याकाळी गुरुग्राममध्ये ही घटना घडली. महिपाल असं आरोपीचं नाव असून, तो 32 वर्षांचा आहे. न्यायाधीशाच्या कुटुंबावरच हल्ला झाल्यानं खळबळ माजली आहे.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश असलेल्या श्रीकांत यांची पत्नी रितू (वय वर्षे 38) आणि मुलगा ध्रुव (वय वर्षे 18) यांच्यावर सुरक्षारक्षक महिपाल याने गोळीबार केला. यात रितू यांचा मृत्यू झाला, तर मुलगा ध्रुव गंभीर जखमी झाला आहे. रितू यांना महिपालने एक गोळी मारली होती, तर ध्रुवच्या डोकं, गळा आणि खांदा अशा तीन ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत.

न्यायाधीशाची पत्नी रितू आणि मुलगा ध्रुव औषधांच्या खरेदीसाठी गेले होते. यावेळी गाडीमधून उतरत असताना आरोपीनं दोघांवर बेछूट गोळीबार केला. पोलिसांनी गुरुग्राम-फरिदाबाद रस्त्यावरुन आरोपीला अटक केलीय. मागील दोन वर्षांपासून तो या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तैनात होता.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. डीसीपी सुलोचना गजराज यांच्या नेतृत्त्वातील एसआयटीमध्ये दोन एसपी आणि 4 पोलिस निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.