नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय जाहीर करुन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात चांगले-वाईट असे विविध परिणाम पाहायला मिळत आहेत. मात्र सोन्याबाबत एक आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे. नोटाबंदीनंतर एका दिवसात 15 टन सोन्याची खरेदी झाली. या सोन्याची किंमत 5 हजार कोटींच्या घरात आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात एकाच दिवसात तब्बल 15 टन म्हणजे सुमारे 15 हजार किलो सोन्याची खरेदी झाली आहे. नोटाबंदीनंतर ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांनी तो प्रामुख्याने सोन्यामध्ये गुंतवल्याचं प्राथमिक अंदाज होता. मात्र आकडेवारीवरुन हे सिद्ध झालं आहे.
एका दिवसात 15 हजार किलो सोन्याची खरेदी ही संपूर्ण देशात मिळून वर्षभरात जितक्या सोन्याची खरेदी होते त्यापेक्षा 5 पट जास्त आहे. इंदूरमध्ये एक दिवसात 100 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली. तर 10 नोव्हेंबरला मुंबईत 260 किलो सोनं विकलं गेल्याची माहिती आहे.