मुंबई : अंदमान-निकोबार बेटांना मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ निर्माण झालं असून यात महाराष्ट्रातले 91 पर्यटक अडकले आहेत. मात्र सर्व जण सुखरुप असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
मंगळवारपासून अंदमान निकोबार बेटांवर जोरदार पाऊस सुरु झाला आहे. वेधशाळेच्या माहितीनुसार काल रात्रीपासून अंदमान भागात ताशी 50 ते 65 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे या भागातील बहुतांश वाहतूक सेवा कोलमडल्या आहेत.
अंदमानला मदत पाठवण्याचे प्रयत्न सरकारने केले आहेत, मात्र जोरदार हवा वाहत असल्यामुळे घटनास्थळी मदत पाठवण्यात अडथळे येत आहेत. बरेच प्रवासी हॅवलॉक येथे परतीच्या प्रवासासाठी थांबलेले आहेत.
देशभरातील 800 जण सध्या अंदमान निकोबारमध्ये आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील 91 जणांचा समावेश आहे. मात्र सर्व जण सुखरुप असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. बुधवारी रात्री पुन्हा चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.