नवी दिल्ली : जेट एअरवेजने आपल्याला न दिलेल्या नोकरीबद्दल वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी हवाईकंपनीचे आभार व्यक्त केले आहेत. केबिन क्रू या पदासाठी स्मृती यांनी केलेला अर्ज जेट एअरवेजने फेटाळला होता.


 
'जेटमधील 'ती' नोकरी मी अर्ज केलेली पहिली नोकरी होती. माझा अर्ज जेट एअरवेज कंपनीने नाकारला होता. माझं व्यक्तिमत्त्व प्रभावी नसल्यामुळे कंपनीतील निवड अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला' असं त्या दिल्लीतील एका पुरस्कार सोहळ्यात म्हणाल्या. या सोहळ्यात जेट एअरवेजच्या एका पदाधिकाऱ्याला इराणींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 
विशेष म्हणजे जेट एअरवेजमधील त्या पदासाठी आपली निवड न केल्याबद्दल स्मृती यांनी आभार व्यक्त केले. त्या नकारानंतर आपण मॅकडॉनल्ड्स या फास्ट फूड चेनसोबत काम करायला लागलो, असं त्यांनी सांगितलं.

 
स्मृती इराणी यांनी एका सौंदर्य स्पर्धेनंतर मॉडेलिंगमधून करिअरला सुरुवात केली. 2000 साली 'क्योंकि सास भी कभी बहु थी' या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या स्मृती यांनी 2014 मध्ये मोदी मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री म्हणून पदाची शपथ घेतली.

 
काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात झालेल्या बदलानंतर मनुष्यबळ विकास मंत्रिपदी असलेल्या स्मृती इराणींना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं.