नवी दिल्ली : प्रसिद्ध मॉडेल जेसिका लालच्या मारेकऱ्याला बहीण सबरीनाने जवळपास दोन दशकांनंतर माफ केलं. आरोपी सिद्धार्थ वशिष्ठ उर्फ मनू शर्माला तिहारच्या ओपन जेलमध्ये शिफ्ट केलं तर त्यावर आपल्याला काही आक्षेप नसेल, असं तिने म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या बहिणीच्या मारेकऱ्याला माफ केलं असून त्याला शिक्षा म्हणून सुटका मिळाली तर आपल्याला काही हरकत नाही, असंही सबरीनाने सांगितलं.
''मनू शर्मा तुरुंगातून अनेक चॅरिटी कामं करत असून सहकारी कैद्यांनाही मदत करतो, असं ऐकलं आहे. त्यामुळे हे त्याचे सुधारण्याचे संकेत आहेत. त्याच्या सुटकेवर माझा कोणताही आक्षेप नाही. त्याने जवळपास 15 वर्षे तुरुंगात घातली आहेत,'' असं सबरीनाने गेल्या महिन्यात जनकल्याण अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
काय आहे जेसिका लाल हत्या प्रकरण?
प्रसिद्ध मॉडेल जेसिका लालची 29 एप्रिल 1999 च्या रात्री दिल्लीतील टॅमरिंड कोर्ट रेस्टॉरंटमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जेसिकाने दारु सर्व्ह करण्यासाठी नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली. हरियाणामधील काँग्रेस नेते विनोद शर्मा यांचा मुलगा मनू शर्मा तिचा मारेकरी होता. जेसिकाला न्याय मिळण्यासाठी कुटुंबीयांना मोठा संघर्ष करावा लागला. सात वर्षे चाललेल्या या खटल्यात 21 फेब्रुवारी 2006 साली सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतरही जेसिकाच्या बहिणीने माघार घेतली नाही. हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर जेसिकाला न्याय मिळवून देण्यासाठी राजधानी दिल्लीसह देश रस्त्यावर उतरला. या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात आला आणि त्यानंतर 20 डिसेंबर 2006 साली जेसिकाचा मारेकरी मनू शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
पॅरोलवर बाहेर येऊन मनू शर्माचं लग्न
मनू शर्माला शिक्षा सुनावल्यानंतर देशात आनंदाची लाट आली. मात्र मोठ्या राजकीय नेत्याचा मुलगा असलेला मनू शर्मा वेळोवेळी तुरुंगातून बाहेर येत राहिला. याच काळात त्याने मुंबईतील एका तरुणीशी लग्न केलं. पॅरोलवर दोन आठवड्यांसाठी तो बाहेर आला आणि चंदीगडमध्ये विवाह केला.
नो वन किल्ड जेसिका
जेसिका लालच्या हत्येवर आधारित नो वन किल्ड जेसिका हा सिनेमा 2011 साली बनवण्यात आला. अभिनेत्री राणी मुखर्जी आणि विद्या बालन या सिनेमात मुख्य भूमिकेत होत्या. बॉक्स ऑफिसवरही प्रेक्षकांनी या सिनेमाला मोठा प्रतिसाद दिला. याशिवाय हल्लाबोल या सिनेमाची कथाही याच सिनेमावर आधारित होती. या सिनेमांमध्ये माध्यमं आणि सर्वसामान्य व्यकींची ताकद दाखवण्यात आली.
19 वर्षांनी बहीण सबरीनाने जेसिकाच्या मारेकऱ्यांना माफ केलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2018 12:07 PM (IST)
आरोपी सिद्धार्थ वशिष्ठ उर्फ मनू शर्माला तिहारच्या ओपन जेलमध्ये शिफ्ट केलं तर त्यावर आपल्याला काही आक्षेप नसेल, असं तिने म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -