मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे( NTA)घेण्यात येणाऱ्या JEE Mains -2021 परीक्षेच्या उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये JEE Main 2021 तिसऱ्या सेशनची परीक्षा 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तर चौथ्या सेशन ची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखा आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्या आहेत


देशातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षेसाठी चार सेशन ठेवण्यात आले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिकची संधी परिक्षेसाठी मिळेल. यामध्ये ही परीक्षा फेब्रुवारी,मार्च, एप्रिल , मे या महिन्यात 4 सेशनमध्ये पार पडणार होती. त्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या असून दुसऱ्या लाटेत देशभरातील कोरोना स्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत



ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव परिक्षेचा अर्ज भरला नसेल, त्या विद्यार्थ्यांना JEE Main 2021 तिसऱ्या सेशनच्या परिक्षेसाठी 8 जुलै पर्यत अर्ज भरता येणार आहे . तर चौथ्या सेशनसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना 9 ते 12 जुलै दरम्यान अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडता सुद्धा येणार आहेत. यावर्षी या परीक्षेसाठी सद्याच्या स्थितीत खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राची संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे. जेणेकरून कोरोनासंबंधी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे काटोकोरपणे पालन होईल याची खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे