पाटणा : भाजपसोबत केवळ बिहारमध्ये आघाडी करणार असून बिहारबाहेर सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा जेडीयूने केली आहे. जेडीयूची कार्यकारिणीची बैठक आज पार पडली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बिहार बाहेरही पक्षाचा विस्तार केला पाहिजे, असं नितीश कुमार यांनी म्हटलं.





बिहारमध्ये जेडीयू एनडीएचा भाग असेल आणि 2020 मधील बिहार विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढू, असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं. मनात कोणताही संभ्रम ठेऊ नका, आपण एनडीएचा भाग आहोत आणि एनडीएमध्ये राहणार आहोत. तसेच बिहारमधील निवडणूकही एकत्र लढणार आहोत, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.





याशिवाय चार राज्यातील निवडणुका जेडीयू स्वतंत्र लढणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. लवकरच दिल्ली, झारखंड, जम्मू काश्मीर, आणि हरयाणा येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. याठिकाणी पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला.