पाटणा : जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद याव आणि अली अनवर यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. दोघांवरही जेडीयूने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राज्यसभा सचिवालयाकडे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीवरुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी दोन्ही नेत्यांचं सदस्यत्व रद्द केलं.
वास्तविक, शरद यादव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी होता. तर अली अनवर यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता. पण पक्षाच्या तक्रारीनंतर राज्यसभा सचिवालयाने त्यांचं सदस्यत्व रद्द केलं.
गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यात अंतर्गत कलह शिगेला पोहचला होता. नितीश कुमारांनी बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबतचं महागठबंधनचं सरकार बरखास्त करत, भाजपशी हातमिळवणी करुन पुन: सत्ता स्थापन केली. याला शरद यादव यांनी तीव्र विरोध केला होता.
त्यानंतर जेडीयूने मनाई करुनही शरद यादवांनी पाटणामधील लालूप्रसाद यादवांच्या ‘भाजप भगाव, देश बचाओ’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात व्यासपीठावरुन नितीश सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं गेलं होतं.
शरद यादव यांनी पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळावं, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगाने शरद यादव यांची ही मागणी फेटाळली होती. पण यानंतर नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यातील उभी फूट स्पष्ट झाली होती.
शरद यादव यांचं राज्यसभेतील सदस्यत्व रद्द झाल्यानंतर, पक्षाचे नेते के.सी. त्यागी यांनी सांगितलं की, “लालू प्रसाद यादवांच्या मोर्चात सहभागी होऊन, शरद यादवांनी पक्षाच्या धोरणांना हरताळ फासला होता. त्यांची ही भूमिका पक्षाच्या नियमांचे उल्लंघन असल्याने, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.”
दरम्यान,शरद यादव यांची राज्यसभेतील सदस्यत्व रद्द झाल्याने, त्यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
जेडीयूचे नेते शरद यादव आणि अली अनवर यांची राज्यसभेतील खासदारकी रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Dec 2017 08:09 AM (IST)
जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद याव आणि अली अनवर यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. शरद यादव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी होता. तर अली अनवर यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता. पण पक्षाच्या तक्रारीनंतर राज्यसभा सचिवालयाने त्यांचं सदस्यत्व रद्द केलं.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -