IC 814 Web Series :  कंदहार विमान अपहरणाच्या घटनेवर आधारीत असलेली 'IC814 द कंदहार हायजॅक' (IC 814 The Kandahar Hijack) ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेब सीरिमध्ये दहशतवाद्यांची दोन नावे हिंदू धर्मीयांशी निगडीत असल्याचे दाखवण्यात आले. त्यावरून काहींनी आक्षेप घेतले होते. आता याच आक्षेपाची दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला समन्स बजावले आहे. नेटफ्लिक्स भारतातील कंटेंट हेडला बोलावणं धाडलं आहे. 


इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 814 या विमानाचे, काठमांडू ते दिल्ली या प्रवासादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून 24 डिसेंबर 1999 रोजी 178 प्रवाशांसोबत अपहरण करण्यात आले होते. विमानातील सशस्त्र दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेतला. दिल्ली या नियोजित गंतव्याऐवजी विमानाला अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे अफगाणिस्तानात कंदहार येथे उतरवण्यात आले. ओलीस प्रवाशांच्या सुटकेसाठी तत्कालीन भारत सरकारने तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. या  प्रकरणावर 'Flight Into Fear: The Captain's Story हे पुस्तक पत्रकार श्रीनिजॉय चौधरी आणि अपहरण झालेल्या विमानाचे कॅप्टन देवी शरण यांनी लिहिले. या पुस्तकाच्या आधारे 'IC814 द कंदहार हायजॅक' वेब सीरिज तयार करण्यात आली.


आक्षेप काय?


या वेब सीरिजमध्ये विमान अपहरणाचा कट, भारतीय प्रवाशांच्या सुटकेसाठी तपास आणि गुप्तचर यंत्रणांची सुरू असलेली धडपड, दहशतवाद्यांचे कट, अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीची भूमिका दाखवण्यात आली आहे. 


विमानाचा ताबा घेतल्यावर विमानातील दहशतवाद्यांनी आपली नावे सांगितली. हे दहशतवादी एकमेकांना शेफ, बर्गर, डॉक्टर, शंकर, भोला या नावांनी संबोधित होते. वेब सीरिजमध्ये शंकर, भोला या नावावर उजव्या विचारांच्या युजर्सने आक्षेप घेतला आहे.   सोशल मीडियावर या वेब सीरिजवर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू करण्यात आला होता. त्याची दखल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतली आहे. 


नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडना


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडना उद्या (मंगळवारी 3 सप्टेंबर 2024) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. IC814 या वेब सीरिजवरून नेटफ्लिक्स कंटेंट हेडना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे समन्स धाडले आहे. IC814 या कंदहार विमान हायजॅकप्रकरणी तयार करण्यात आलेल्या वेबसिरीजमधून नेटफ्लिक्सने दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक गैर-मुस्लिम नावे देण्यात आल्याचा नेटफ्लिक्सवर आरोप करण्यात आला आहे.