PM Modi And Japanese PM Kishida : पुढील पाच वर्षांत जपान भारतामध्ये 3.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारत आणि जपानमध्ये शनिवारी सहा करार झाले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमिओ काशिदा शनिवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी सायंकाळी शिखर परिषदेत काशिदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. भारत आणि जपानमध्ये 2018 ऑक्टोबरमध्ये अखेरची वार्षिक शिखर बैठक झाली होती. 2019 मध्ये हुवाहाटी येथे होणारी शिखर परिषद रद्द झाली होती. तर 2019 आणि 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे शिखर परिषद रद्द करावी लागली होती. आज, शनिवारी भारत आणि जपानमध्ये मोठे सहा करार झाले आहेत. 






शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर भारत आणि जपानमध्ये  सहा करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. 2014 मध्ये झालेल्या गुंतवणूक प्रोत्साहन भागिदारीनुसार, 3.2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचं लक्ष असल्याची घोषणा केली. यासोबतच स्वच्छ ऊर्जा भागिदारीचीही घोषणा केली. 


यूक्रेन हल्ल्यावर काय म्हणाले किशिदा?
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यावर जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शक्तीचा वापर करुन हल्ला करण्याचा आणि कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नांना परवानगी देऊ नये. आम्ही यूक्रेनच्या परिस्थितीवर चर्चा केली. रशियाचा हल्ला गंभीर आहे, कारण यामुळे राष्ट्रीय नियमांना मोडले आहे.  






पंतप्रधान काय म्हणाले?
जगातील अनेक देश अद्याप कोरोना आणि त्याच्या प्रभावाखाली आहेत. जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती होण्यास अनेक अडचणी येत आहेत. जियो पॉलिटिकल घटना यामध्ये नवीन अडचणी निर्माण करत आहेत. या संदर्भात, भारत-जपान या दोन देशातील भागिदारीला आणखी घट्ट करणे हे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे नाही. यामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशात आणि जागतिक स्तरावर शांतता, समृद्धी आणि स्थैर्याला प्रोत्साहन मिळेल, असे मोदी म्हणाले. आज भारत 'मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड'साठी अमर्याद शक्यता तयार करत आहे. यासंदर्भात जपानमधील अनेक कंपन्या भारताच्या ब्रँड अंबेसडर राहिल्या आहेत, असेही मोदी म्हणाले.