मुंबई : देशभरातील जनधन खात्यांमधून मागील 15 दिवसात 3285 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. नोटाबंदीनंतर याच जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करण्यात आली होती.


अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 7 डिसेंबर अखेरीस जनधन खात्यांमध्ये 74610 कोटी रुपये जमा होते. मात्र त्यानंतर सातत्यानं या जनधन खात्यांमधून रक्कम काढण्यात आली. बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याची मुदत संपण्याआधी 28 डिसेंबरला जनधन खात्यांमधील रक्कम कमी होऊन 71,037 कोटी रुपयांवर आली.

नोटाबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा भरल्याचा संशय व्यक्त करत रिझर्व बँकेनं जनधन खात्यांमधून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. यात जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढण्याची मर्यादा ठेवण्यात आली. मात्र तरीही 15 दिवसांमध्ये याच खात्यांमधून 3,285 कोटी रुपये काढण्यात आले.

9 नोव्हेंबरला 25.5 कोटी जनधन खात्यांमध्ये 45,636.61 कोटी रुपये जमा होते. नोटाबंदीनंतर एकाच महिन्यात या खात्यांमध्ये 28,973 कोटी रुपये भरण्यात आले.