Jammu-Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये (Anantnag) दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी सोमवारी (29 मे) जंगलात मंडीजवळील अम्युझमेंट पार्कमधील सर्कसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. दीपू असं या नागरिकाचं नाव असून तो उधमपूरचा रहिवासी आहे. जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.


या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्वीटद्वारे दिली.






ओमर अब्दुल्ला यांच्याकडून हल्ल्याचा निषेध 


तर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करुन या हल्ल्याचा निषेध करत शोक व्यक्त केला. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग भागात एका नागरिकावर झालेल्या हल्ल्याच्या बातमीने दु:ख झाल्याचं त्यांनी म्हटलं. एका करमणूक उद्यानात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या दीपूची हत्या ही निंदनीय कृत्य आहे आणि मी या घृणास्पद हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दिपूच्या आत्म्याला शांती लाभो, असं ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.






याआधी दुकानदारावर गोळीबार


याआधीही अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी एका दुकानदारावर गोळीबार केला होता. मागील महिन्यात अनंतनाग जिल्ह्यातील मरहामा इथे दहशतवाद्यांनी आकिब अहमद दार (वय 31 वर्षे) याच्यावर गोळीबार केला होता. अहमद दार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. 


सुरक्षा दलावर गोळीबार


याशिवाय या महिन्याच्या 4 तारखेला अनंतनागच्या बिजबेहेरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला होता. पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. बिजबेहेरा भागात संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली होती.