Jammu Kashmir Terrorist Encounter : भारतीय लष्कराला (Indian Army) मोठं यश मिळालं आहे. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचा (Pakistan) कट उधळून लावत पाच दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाच दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत त्यांना कंठस्नान घातलं आहे. या महिन्यात काश्मीर खोऱ्यात घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न होता.


भारतीय लष्कराला मोठं यश


भारतीय सैन्य दल आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी 16 जून रोजी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानच्याहदशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला. कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LOC) भारतीय सैन्य दलाने पाच दहशतवाद्यांना ठार केलं. हे दहशतवादी रात्रीच्या वेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यावर कारवाई करण्यात सैन्य दलाला यश मिळालं आहे.


पाच दहशतवाद्याचा खात्मा


सैन्य दलाला उत्तर काश्मीर जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील जुमागुंड भागातील दहशतवाद्यांच्या कटाबाबत सुत्रांकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दहशतवाद्यांना ठार केलं. नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केल्यानंतर शुक्रवारी सकाळी चकमक सुरू झाली. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), विजय कुमार यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देत सांगितलं आहे की,''चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले. परिसरात शोध सुरू आहे.''


भारतीय हद्दीत घुसखोरीचा दुसरा मोठा प्रयत्न


जवानांनी घटनास्थळावरून पाच एके सिरीज रायफल, मॅगझिन आणि पाकिस्तानी खुणा असलेले डे अँड नाईट गॉगल जप्त केले आहे. सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये या महिन्यात घुसखोरीचा हा दुसरा मोठा प्रयत्न आहे. यापूर्वी 13 जून रोजी कुपवाडा जिल्ह्यात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


घुसखोरीबाबत गुप्तचर संस्थांकडून माहिती


कुपवाडा येथील दहशतवादी कारवाईबाबत माहिती देताना जनरल गिरीश कालिया यांनी सांगितलं की, नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीबाबत विविध गुप्तचर संस्थांकडून मोठ्या प्रमाणात गुप्तचर माहिती प्राप्त झाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.


दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित याचा शोध सुरु


जनरल गिरीश कालिया यांनी पुढे सांगितलं आहे की, घुसखोरी करणारे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांच्या कोणत्या संघटनेची संबंध आहे, याबाबत तपास सुरु आहे.


पोलीस आणि लष्कर यांच्यातील समन्वयाचं उदाहरण


जनरल गिरीश कालिया म्हणाले की, "हे यशस्वी गुप्तचर ऑपरेशन भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिस यांच्यातील समन्वयाचं आणखी एक उदाहरण आहे. लष्कर आणि पोलीस दोन्ही काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या शत्रूचा हेतू हाणून पाडण्यासाठी प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहेत.''