Jammu Kashmir : भारतीय सुरक्षा दलाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा नापाक कट हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलांनी पाकिस्तानचे आणखी एक ड्रोन पाडले आहे. कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस स्टेशन हद्दीतील तल्ली हरिया चक येथे सीमेवर  हे ड्रोन पाडले आहे. या ड्रोनला एक बॉम्बसदृश वस्तू जोडलेली असून या वस्तूचा बॉम्ब निकामी पथक तपास करत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. 


जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी ड्रोनला शेतात उडताना पाहिले होते. त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ड्रोन खाली पाडले.


कठुआचे एसएसपी आरसी कोतवाल यांनी सांगितले की, ड्रोनची माहिती मिळाल्यानंतर राजबाग पीएसचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ड्रोन खाली पाडले. पोलिसांनी ड्रोनसह सात चुंबकीय प्रकारचे बॉम्ब IED आणि 7 UBGL (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर्स) जप्त केले आहेत. या घटनेनंतर बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा अधित तपास केला जात आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे. 




सीमेपलीकडून वारंवार ड्रोनच्या हालचाली 


याबाबात माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सीमेपलीकडून वारंवार ड्रोनच्या हालचाली होत असल्याने पोलिसांची शोध पथके नियमितपणे त्या भागात पाठवली जात आहेत. दरम्यान, दक्षिण काश्मीर हिमालयातील पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 30 जूनपासून 43 दिवसांची अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे.