Operation Sindoor: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात पहलगामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जावं अशी मागणी सातत्याने होत होती. आज (बुधवारी) अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानातील 9 ठिकाणांवरती एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता भारताने केलेल्या हल्ल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत ही खरी श्रध्दांजली असल्याचं म्हटलं आहे. पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झालेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यानी 'एक ऑपरेशन न करता अनेक ऑपरेशन करून हे दहशतवाद मुळासकट उखडून टाकावा' असं म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला
एबीपी माझाशी बोलताना हर्षल लेले यानी त्याच्या बाबांची एक आठवण सांगितली आहे. टीव्हीवर बातमी बघताना मला वडिलांची आठवण आली. जेव्हा पुलवामा हल्ला झालेला तेव्हा बाबांनी मला मिठी मारली होती. आता या हल्ल्यामुळे त्यांना थोडीशी शांती मिळाली असेल. त्यांना वाटलं असेल की, आपण उगाच मेलो नाही देशासाठी मेलो. त्यांना वाटलं असेल देश आपल्या पाठीशी आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला असं म्हणू शकतो. पण, एक ऑपरेशन न करता अनेक ऑपरेशन करून हे दहशतवाद मुळासकट उखडून टाकावा. आर्मी, एअर फोर्स, नेव्ही या तिन्ही बाजूने असे ऑपरेशन्स चालू ठेवावेत, या आधी सुद्धा दोन वेळी आपण हल्ला केला होता, तरी सुद्धा त्यांनी हिंमत केली आहे, आता त्यांना अशी अद्दल घडवायची की त्यांनी परत कधी अटॅक केला नाही पाहिजे, पुन्हा हल्ला करायला ते उरलेच नाही पाहिजे, असंही त्यानी पुढे म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूर हे नाव योग्य दिलं
मला काल रात्री झोप येत नव्हती आणि त्यात माझ्या मित्राचा फोन मेसेज आला. त्याने मला सांगितलं टीव्ही चालू कर बघ. अटॅक आपण केला आहे. टीव्हीवर जेव्हा मी बातमी बघितली तेव्हा थोडं समाधान वाटलं. ऑपरेशन सिंदूर हे नाव योग्य दिलं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा कोणत्या पुरुषाचं निधन होतं. तेव्हा त्या पुरुषाची बायको टिकली लावत नाही. हे जे 27 लोक मारले गेले त्यांच्यासोबत सुद्धा हेच झालं ना. जी मृत पावले त्यांच्यासाठी हे सिम्बॉलिक नाव आहे. आमच्या कुटुंबाचे दुःख पूर्णपणे जाणार नाही. थोडं समाधान आहे की, जे गेले त्यांचा बदला घेतला गेला. हा एकमेव बदला नसावा हे कंटिन्यू ऑपरेशन सुरू ठेवावेत. माझे इतर दोन माझ्या नातेवाईकांशी बोलणं झालं नाही. भारत सरकारकडून अपेक्षा होती की असं काहीतरी होणार आहे. बैठका चालू होत्या, पाणी थांबवलं होतं, त्यामुळे काहीतरी होणार हे वाटत होतं, असंही हर्षल लेले यानी बोलताना सांगितलं आहे.
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त
(बहावलपूर (02), मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक आमरू, सियालकोट येथे हवाई हल्ले करण्यात आले). या हवाई हल्ल्यात या ठिकाणी असलेले अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले.
1. बहावलपूर (2): जैश-ए-मोहम्मद मुख्यालय (जिथे 16 एप्रिल रोजी हमास कमांडरचे स्वागत करण्यात आले होते)
2. मुरीदके: लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
3. मुझफ्फराबाद: हिजबुल मुजाहिद्दीनचा तळ
4. कोटली: दहशतवादी तळ
5. गुलपूर: दहशतवादाचे लाँच पॅड
6. भिंबर: दहशतवादाचे लाँच पॅड
7. चक अमरू: टेरर लाँच पॅड
8. सियालकोट: दहशतवादी तळ