श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद सुरुच आहे. शोपियामध्ये जिल्हा कोर्टात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना ओलिस धरुन दहशतवाद्यांनी चार असॉल्ट रायफलसह पाच रायफल आणि काडतुसं लुटली.
या पाच पोलिसांनी दहशतवाद्यांना विरोध न केल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
सर्व दहशतवादी लष्कारच्या वर्दीत आले होते. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांना चौकीपर्यंत येण्यास मज्जाव केला नाही. पण लष्कराच्या वर्दीत दहशतवादी असल्याचं समजण्याआधीच अतिरेक्यांनी पोलिसांना घेरलं. रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास घडलेल्या घटनेत दहशतवाद्यांनी पोलिसांच्या चार असॉल्ट रायफल, एक इन्सॅस रायफलसह त्यांचे मॅग्झिन आणि काडतुसं लुटली. त्यानंतर तिथून पोबारा केला.
दरम्यान, अतिरेक्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु केली असून परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.