श्रीनगर : एलओसीवर भारतीय सैन्याने एका कारवाईत पाकिस्तानच्या दोन जवानांना कंठस्नान घातलं. भारतीय जवानाच्या बलिदानाचा 24 तासाच्या आत भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आला आणि या कारवाईतून भारताने पाकिस्तानला सनसनीत उत्तर दिलं.
रविवारी आणि सोमवारी पाकिस्तानमधून दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय सैनिकाला वीरमरण आलं. याचाच बदला घेण्यासाठी प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दोन जवानांचा खात्मा केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, शहीद झालेले पुष्पेंद्र कुमार यांनी एलओसीवर तैनात असताना दहशतवाद्यांची घुसखोरी हाणून पाडली. याचवेळी पाकिस्तानी सैन्याकडून पुष्पेंद्र कुमार यांच्यावर स्नायपर फायरिंग केली. पुष्पेंद्र कुमार यांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे त्यांना वीरमरण आलं. पाकिस्तानच्या याच नापाक कृत्याचा बदला भारतीय सैन्याने अवघ्या 24 तासात घेतला.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तंगधार सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने आपल्या सैनिकाच्या बलिदानाचा बदला घेतला आणि पाकिस्तानकडून सातत्याने होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन, घुसखोरी याविरोधात भारतीय सैन्याने धडक कारवाई केली. यात पाकिस्तानच्या दोन जवानांना कंठस्नान घालण्यात आलं.”
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये वाढ झाली आहे. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान सैन्याच्या मदतीने दहशतवादी घुसखोरी करतात. पाकिस्तानी सैन्य भारतीय सैनिकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करुन दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करतं.
एलओसीवर भारतीय सैनिकाच्या बलिदानाचा 24 तासात बदला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2018 05:57 PM (IST)
भारतीय जवानाच्या बलिदानाचा 24 तासाच्या आत भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आला आणि या कारवाईतून भारताने पाकिस्तानला सनसनीत उत्तर दिलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -