जम्मू : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये ऑपरेशन ऑलआऊटअंतर्गत बिजबेहरामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. काही परिसरात अजूनही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली जात असून, सर्च ऑपरेशन सुरु आहे.


घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. बिजबेहराच्या सेकीपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात केली. अतिरेक्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. हे अतिरेकी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असू शकतात.

याआधी कुलगाममध्ये सैन्याच्या आरआर कॅम्पवर गुरुवारी सकाळी अतिरेकी हल्ला झाला होता. यामध्ये एका स्थानिक नागरिक जखमी झाला होता. यावेळी सैन्याने प्रतिकारवाई केली होती, परंतु तेव्हा दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.

तर मंगळवारी शोपियामध्ये सैन्यासोबतच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे चार अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. यात एक जवानही शहीद झाला होता आणि तीन जवान जखमी झाले होते.