श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला असून, ठार झालेले चारही दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याचं समोर आलं आहे. तसंच या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर आणि त्याचा भाऊ रौफ असगर असल्याची माहिती समोर येते आहे.


उरी दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय लष्करानं ही माहिती दिली.

धक्कादायक गोष्ट ही की कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांकडून मिळालेल्या साऱ्या वस्तू या पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे.

या हल्ल्यासाठी एकूण 16 अतिरेक्यांची टोळी भारतात घुसल्याचं लष्करानं मान्य केलं. त्यामुळे अजूनही 12 अतिरेकी हे काश्मीरमध्ये मोकाट असू शकतात, अशी माहितीही लष्करानं दिली आहे.

दरम्यान, भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत.. त्यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून उरीमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला.