नवी दिल्ली: जैशचा दहशतवादी हिदायतुल्लाने पाकिस्तानच्या एका कटाचा खळबळजनक खुलासा केला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावरील हल्ल्यावर पाकिस्तान बारीक लक्ष ठेवून आहे, हे दहशतवाद्याने उघड केले आहे. यासाठी पाकिस्तानने डोभाल यांच्या कार्यालयाची रेकीदेखील केली होती. दहशतवादी हिदायतुल्लाने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदचा हँडलरना या रेकीचे अनेक महत्त्वाचे व्हिडिओ पाठवले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिदायतुल्लाला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने हा खुलासा केला आहे.


उरी सर्जिकल स्ट्राईकपासून अजित डोभाल हे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर होते. पण आता हे उघड झाले आहे की डोभाल यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने जैश दहशतवादी हिदायतुल्लाने रेकी केली होती. हा खुलासा झाल्यानंतर अजित डोभाल यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


हिदायतुल्लाहला अटक कशी झाली?


जम्मू काश्मीर पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी दहशतवादी संघटना लष्कर-ए-मुस्तफाच्या (एलईएम) हिदायतुल्लाह याला अटक केली. हिदायतुल्लाह जम्मूमध्ये एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होता. सुरक्षा दलांचा असा दावा आहे की हिदायतुल्लाहला पकडण्यासाठीचं ऑपरेशन यावर्षी जानेवारीमध्येच सुरू झालं होतं.


जम्मूमध्ये आपली दहशतवादी संघटना बळकट करण्यासाठी हिदायतुल्लाहने शहरातील भटिंडी भागात एक घर भाड्याने घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने कबूल केले की तो जम्मूमधील जैश-ए-मोहम्मदच्या ओजीडब्ल्यूचा वापर करून शहरात मोठा आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचत होता.


यावर्षी 18 जानेवारीला पोलिसांनी अनंतनाग येथील रहिवासी अयाज भट याला अटक केली होती. चौकशीत अयाजने त्याने अटक केलेले दोन साथीदार रईस मीर आणि शकीर इटू यांनाही हिदायतुल्लाहचे साथीदार म्हणूनही सांगितले. या सर्वांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या म्होरक्याला अटक केली. हिदायतुल्लाहकडून सुरक्षा दलाला दोन पिस्तूल आणि काही ग्रेनेडही सापडले.