नवी दिल्ली: जैन मुनी तरुण सागर यांचे निधन झालं आहे. ते 51 वर्षांचे होते. पूर्व दिल्लीतील राधापुरी जैन मंदिरात 3 वाजता तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. 26 जून 1967 रोजी मध्यप्रदेशच्या दहोह जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. तरुण सागरचे मूळ नाव पवन कुमार जैन हे होते.

20 दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाली होती. त्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणाच होत नसल्यानं त्यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाण्याचा निर्णय घेतला होता.

काही दिवसांपासून तरुण सागर हे पुष्पदंत सागर महाराजांच्या परवानगीने संथारा घेत होते. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणं.

कडव्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध

जैन मुनी तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळेच त्यांना क्रांतिकारी संत असंही संबोधलं जात. कडवे प्रवचन नावाची त्यांची पुस्तिकही प्रसिद्ध आहेत.

तरुण सागर यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जा दिला होता.

कोण आहेत तरुण सागर?

मुनी तरुण सागर यांचं नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला.

त्यांच्या आईचं नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र आहे.

मुनीश्री तरुण सागर यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.

काय आहे संथारा?

जैन धर्माच्या मते, मृत्यू समीप आल्याचं पाहून काही व्यक्ती अन्न-पाण्याचा त्याग करतात. जैन शास्त्राच्या मते याप्रकारच्या मृत्यूला संथारा किंवा संल्लेखना म्हणजेच मृत्यू पर्यंत उपवास करणं म्हणतात. याला जीवनाची अंतिम साधना मानली जाते.

कोर्टाचा विरोध

राजस्थान हायकोर्टाने 2015 मध्ये संथाराला आत्महत्येसारखेच असल्याचं सांगत, दंडनीय केलं होतं. मात्र दिगंबर जैन परिषदेने हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठातील प्राध्यापक वीर सागर जैन यांच्या मते, संथाराची प्रक्रिया 12 वर्षांपर्यंत चालते. ही जैन समाजाची आस्था आहे, त्याला मोक्ष प्राप्तीचा मार्ग समजलं जातं.

संबंधित बातम्या

पाकमध्ये जेवढे दहशतवादी नाहीत तेवढे आपल्या देशात गद्दार: तरुण सागर