Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात दररोज अटक आणि नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान, हिंसाचाराच्या एक दिवस आधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही लोक लाठ्या जमा करताना दिसत आहेत. 15 एप्रिलच्या सीसीटीव्हीचे हे फुटेज रात्री 2:11 मिनिटांचे आहे.


15 एप्रिलच्या जहांगीर पुरीच्या या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस कटाच्या तपासात गुंतले आहेत. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मिरवणुकीदरम्यान दंगलीचा कट अगोदरच तयार केला जात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.






सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हे लोक लाठ्या गोळा करत होते, तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर किरकोळ हाणामारीही झाली होती. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून स्थानिक लोकांचे जबाबही नोंदवले जातील. जेणेकरून खटला कोर्टात भक्कमपणे ठेवता येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओचाही तपास केला जात असून, लोकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आपला प्राथमिक तपास अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला आहे. या अहवालात संपूर्ण घटनेची माहिती देताना दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिल्ली पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाला आहे. या घटनेची माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ही घटना असामाजिक तत्वांच्या सुनियोजित कटाचा भाग होती. जी दिल्ली पोलिसांनी वेळीच उधळून लावली. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जात असून आतापर्यंत एकूण 24 जणांना अटक करण्यात आली आहे.