नवी दिल्ली:  हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत (Himachal Pradesh Election)  भाजपचा पराभव झाल्यानंतर नड्डांचं ( J P Nadda) काय होणार याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. हिमाचल हे नड्डांचं गृहराज्य...तिथेच पराभूत झाल्यानं नड्डांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या प्रतिमेवर काही परिणाम होतो का याचीही चर्चा होती. पण दिल्लीत लवकरच होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांना मुदतवाढीची शक्यता आहे. 


 भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत येत्या 16-17 जानेवारीला भाजपचं राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन होणार आहे. त्यात नड्डांना ही मुदतवाढ दिली जाणार अशी जोरदार चर्चा आहे. किमान लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी नड्डा यांना या पदावर मुदतवाढ मिळू शकते. नड्डा यांना ही मुदतवाढ मिळेलच असं आधी गृहीत धरलं जात होतं. पण हिमाचल प्रदेश या त्यांच्या स्वत:च्या राज्यात भाजपचा नुकताच पराभव झाला. त्यानंतर नड्डा यांच्या प्रतिमेला धक्का गेल्यानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना कायम ठेवलं जाईल का याची कुजबूज सुरु झाली होती.


खरंतर लोकसभा निवडणुकीला आता अवघं एक वर्ष उरलं आहे. त्याआधी याच वर्षात 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुठला बदल लगेच करायला मोदी-शाह तयार नसावेत. भाजपच्या अध्यक्षपदाबद्दलची ही घडामोड महाराष्ट्रासाठीही महत्वाची आहे, कारण अधूनमधून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचीही अफवा पसरत असते. पण नड्डांना मुदतवाढ मिळणार असल्यानं फडणवीस तूर्तास राज्यातच हेही पक्कं असेल. 


नड्डांना अध्यक्षपदासाठी मुदतवाढ



  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अमित शाह केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले

  • त्यानंतर सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डांची निवड झाली

  • जानेवारी 2020 मध्ये नड्डांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाली होती

  • तीन वर्षांची ही टर्म या जानेवारीत संपणार आहे 

  • लोकसभा निवडणुकीपर्यंत नड्डांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता 


 16 -17 जानेवारीला दिल्लीत होणारी ही कार्यकारिणी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनंही महत्वाची असेल. पक्षात काही महत्त्वाचे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत, तिथे विशेष करुन काही बदलांचे संकेत आहेत. 


 राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक आधी मध्य प्रदेश किंवा राजस्थान..जिथे निवडणुका होणार आहेत तिथे करावी अशी चर्चा होती. पण शेवटी दिल्ली हेच स्थान पक्कं झालंय. लोकसभा निवडणुकीआधीचं वर्ष, 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर नड्डांची ही मुदतवाढ हेच या बैठकीचं विशेष असेल.