मुंबई : नोटाबंदी आणि त्यानंतरची स्थिती हाताळवण्यावरून रिझर्व बँकेवर झालेल्या टीकेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे. आम्ही आता गेंड्याची कातडी धारण केलीय, असं मत रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केलं. त्याचवेळी थोड्याशा घसरणीनंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा नवी उभारणी घेईल असंही ते म्हणाले.


नोटाबंदीचा निर्णय अतिशय कमी कालावधीत घेण्यात आला, मात्र आता परिस्थिती खूपच निवळली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नोटाबंदीच्या फक्त दोन महिन्यांपूर्वीच गव्हर्नर उर्जित पटेल यांनी रिझर्व बँकेची धुरा सांभाळली होती.

फक्त रिझर्व बँकच नाही, तर देशातील बँकिंग व्यवस्थेनेच अतिशय मोलाची कामगिरी बजावली असल्याचंही त्यांनी सांगितलं. नोटाबंदीनंतरची परिस्थिती हाताळण्याविषयी झालेली टीका ही आम्ही सकारात्मक पद्धतीने घेतली आणि त्यातून काही सुधारणाही केल्या असं उर्जित पटेल म्हणाले.

नोटाबंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा इंग्रजी 'व्ही' आकाराचा असेल. कारण सुरुवातीला अचानक येणारी घसरण आणि त्याच वेगाने नवी उभारी म्हणजेच इंग्रजी व्ही आकारासारखी असल्याचं त्यांनी सांगितलं.