नवी दिल्ली: आयटी क्षेत्रात मागील तीन वर्षात तब्बल सहा लाख तरुणांना नोकऱ्या मिळाल्याचा दावा सरकारनं केला आहे. आयटीत क्षेत्रातील अनेकांना काढण्यात आल्याचा बातम्याही निराधार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.


काही दिवसांपूर्वीच मोठ्या आयटी कंपनीनं हजारो लोकांना काढल्याचं वृत्त आलं होतं. पण सरकारच्या मते, कामाच्या आधारावर काही लोकांना काढण्यात आलं होतं आणि ही काही नवी गोष्ट नाही. पण या आधारावर आयटी क्षेत्रात नोकऱ्या नाही असं म्हणणं चुकीचं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आयटी कंपन्यांची संस्था नॅस्कॉमच्या हवाल्यानं सरकारनं हा दावा केला आहे.

याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘आतापर्यंत आयटी क्षेत्रात तब्बल 39 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. तर 2025 पर्यंत 25 ते 30 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील.’ एजन्सी टीमलीजच्या हवाल्यानं रविशंकर प्रसाद यांनी हा दावा केला आहे. तसेच ऑक्टोबर ते मार्च दरम्यान रोजगाराच्या बाबतील 4 टक्के वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच मागील वर्षभरात (2016-17) आयटीत 1.7 लाख जणांना रोजगार देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

यावेळी डिजिटल इंडियाची माहिती देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की,

- कॉमन सर्विस सेंटर म्हणजेच सीएससीने ग्रामीण भागात 10 लाख जणांना रोजगार दिला आहे.

- आयटी आणि आयटीईएसच्या माध्यामातून आतापर्यंत प्रत्यक्षरित्या 40 लाख आणि अप्रत्यक्षरित्या 1.3 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे.

- मागील 30 महिन्यात 72 मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग युनिटनं काम करणं सुरु केलं आहे. त्या माध्यमातून 1 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. तर 3 लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला आहे.

- आता बंगळुरुमध्ये अॅपलचं मॅन्युफॅक्चरिंग सुरु झालं आहे. ज्याचा पुढे बराच विस्तार होणार आहे. त्यामुळे इथेही बऱ्याच जणांना रोजगार मिळू शकतो.