श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने रविवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरुन सॅटेलाईट कॅरियर 'पोलर सॅटेलाईट लाँच व्हेहिकल' (पीएसएलव्ही) सी 42 च्या मदतीने दोन ब्रिटीश उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. हे उपग्रह पृथ्वीवरील घडामोडींवर लक्ष ठेवतील.

या उपगृहांचं नाव NovaSAR आणि S1-4 असं आहे. ब्रिटनमधील सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या या उपगृहांचं वजन 889 किलो आहे.

भारत जागतिक अंतराळ क्षेत्रात 300 बिलियन डॉलरपेक्षा जास्त भागीदारीसह अव्वल देश बनला आहे. गेल्या काही काळात सर्वात कमी खर्चात उपग्रह पाठवण्याचं काम 'इस्रो'कडून केलं जात आहे. पीएसएलव्ही सी 42 ही अशी पहिली उड्डाण होती, जी पूर्णपणे व्यावसायिक स्वरुपाची होती.

या उपग्रहांच्या माध्यमातून फॉरेस्ट मॅपिंग, जमीन वापर, बर्फ आच्छादनावर लक्ष ठेवणे, पूर आणि नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवणे अशी उद्दीष्ट साध्य करता येणार आहेत.


'इस्रो'च्या या यशस्वी कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.