हैदराबाद : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) गुरुवारी "पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-43" च्या मदतीने सकाळी 10 वाजता 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात झेपावले. विशेष म्हणजे 30 उपग्रहांपैकी 23 उपग्रह अमेरिकेचे आहेत. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या 7 देशांचे उपग्रहदेखील सोबत आहेत.

पीएसएलव्ही सी-43 सोबत भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट हा उपग्रहदेखील अवकाशात झेपावला. हे पीएसएलव्हीचे 45 वे प्रक्षेपण आहे. इस्रोतर्फे देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही - सी 43 चे गुरुवारी सकाळी 9.58 वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

इस्रो सतत नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. सातत्याने भारतासह इतर देशांचे उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपण करत आहे. इस्रोने 14 नोव्हेंबर रोजी जीएसएलव्ही-एमके-3-डी2 या प्रक्षेपकाद्वारे GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. त्यानंतर आज पुन्हा 30 उपग्रहांचे प्रक्षेपण इस्रोद्वारे केले.