नवी दिल्ली पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने (Hamas) इस्रायलवर (Israel Hamas War) केलेल्या हल्ल्यानंतर बुधवारी (11 ऑक्टोबर) पाचव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. या युद्धजन्य परिस्थितीत नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांने इस्रायलमध्ये  असलेले भारतीय नागरीक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन अजय' सुरू करण्यात आले आहे. 


परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडिया X वर याबाबतची माहिती दिली आहे. “इस्रायलमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे. परदेशात राहणाऱ्या आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असेही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले. 






वृत्तसंस्था पीटीआयने मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांच्या हवाल्याने सांगितले की, इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. दूतावासाकडून गुरुवारच्या विशेष विमानासाठी नोंदणीकृत भारतीय नागरिकांच्या पहिल्या तुकडीला ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच्या विमानासाठी इतर नोंदणीकृत भारतीयांना ई-मेल  आणि इतर माध्यमातून संदेश पाठवले जाणार असल्याचे इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाने माहिती दिली आहे. 


इस्रायलने स्थापन केलं आपत्कालीन सरकार 


 इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन समर्थित अतिरेकी संघटना हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. या पाचव्या दिवशी इस्रायलने मोठा निर्णाय घेतला आहे. हमासशी लढण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी विरोधी पक्षांसोबत आपत्कालीन सरकार स्थापन केले आहे. सत्ताधारी लिकुड पक्षाच्या युतीने यावर सहमती दर्शवली होती. इस्रायलमध्ये स्थापन केलेल्या या सरकारमध्ये सर्व पक्षांचा समावेश असेल. यामध्ये एक युद्ध मंत्रिमंडळ तयार केले आहे.


इस्रायलने स्थापन केलेल्या आपत्कालीन सरकारचं प्राथमिक उद्दीष्ट हे गाझामधील हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षावर लक्ष केंद्रित करणे आहे. या गंभीर काळात कोणतीही असंबंधित धोरणे किंवा कायदे पुढे नेण्यापासून परावृत्त करणे आहे. हमासने इस्रायलवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या सरकारनं विरोधी पक्षांसह सैन्यात सामील होऊन आपत्कालीन सरकार निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. इस्रायलमध्ये 1973 नंतर प्रथमच अशा आपत्कालीन सरकारची घोषणा करण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :